रविवार, २४ जानेवारी, २०१६

---|| फलटण संस्थान ||---

मुंबई, सातारा जिल्ह्यांतील एक जहागीर. येथील जाहागीरदाराचें आडनांव निंबाळकर. मुख्य गांव फलटण. जहागिरीच्या उत्तरेस नीरा; पूर्वेस सोलापूर जिल्हा; दक्षिणेस माण, व खटाव तालुके; पश्चिमेस वाई व कोरेगांव हे तालुके. एकदंर गांवे ७२ आहेत क्षेत्रफळ ३९७ चौरस मैल व लोकसंख्या (१९२१) ५५९६६. उत्पन्न २ लाख रु. इंग्रज सरकारास ९६०० रु. खंडणी जाते. जहगिरीतींल उत्तरेचा नीराथडीचा प्रांत सुपीक व दक्षिणेचा डोंगराळ आहे. पाऊस फार कमी पडतो. हवा उष्ण आहे. ज्वारी, बाजरी, तूर, हरभरा ही मुख्य पिंके होत. नीरा व बाणगंगा या मोठ्या नद्या. फलटण गावीं रामनवमीचा मोठा उत्सव होतो. येथें मानभावांचे एक जुने देवस्थान आहे. येथें एक हायस्कूल, दवाखाना व म्युनिसिपालिटीही आहे.
इतिहास- महाराष्ट्रांतील राजघराण्यांत फलटणच्या निंबाळकराचें घराणे फार जुनें असून सुमारे सहा सातशें वर्षें तें राज्योपभोग घेत आहे. धारच्या परमार रांजावर दिल्लीच्या सुलतानांनीं पुन्हां पुन्हां हल्ले केले, त्या धामधुमींत निंबराज परमार नांवाचा एक पुरुष दक्षिणेंत फलटणनजीक शंभुमहादेवाच्या रानांत सन १२४४ च्या सुमारास येऊन राहिला. निंबराज ज्या गावीं राहिला त्यास निंबळक आणि त्यावरून त्याच्या वंशास निंबाळकर अशें नाव पडले. निंबराजाच्या वंशजांनी पुढे फलटण हें गाव वसविलें आणि तेथें ते वतन संपादून राहूं लागले. महंमद तुघ्लखाच्या वेळेस ह्यांस 'नाईक' हा किताब व फलटणची देशमुखी मिळाली. पुढें आदिलशाहींत निंबाळकराचें महत्त्व विशेष वाढलें. निंबराजापासून चवदावा पुरुष वणंगपाळ उर्फ जगपाळराव म्हणून झाला, त्याच्या पूर्वीची माहिती उपलब्ध नाहीं.
जगपाळराव हा शूर व फौजबंद होता. स.१५६९ च्या सुमारास तो फटलणचा कारभार पाहूं लागला.हिंगणी बेरडीचे भोंसले दरसाल चैत्रांत शंभुमहादेवाच्या यात्रोस जात. रस्त्यात त्यांचा मुक्काम फलटणास निंबाळकरांकडे होई. बाबाजी भोंसल्याचे दोघे मुलगे मालोजी व विठोजी हे जगपाळरावाचे समवयीच होते. भोसलें बंधूची इभ्रत, ज्वानी व हिंमत पाहून त्या उभयतांचा ॠणानुबंध वाढला. जगपाळराव आजूबाजूस आपला प्रदेश वाढवीत होता, त्या कामीं त्यास मालोजी व विठोजीचा चांगला उपयोग झाला. असे सांगतात कीं, स.१५९०-९२ च्या सुमारास जगपाळरावाची फौज कोल्हापुरकडील कांहीं प्रांत जिकीत असतां, त्याजवर आदिलशहाची फौज चालून आली. पुढें लढाई झाली, तींत भोसलेबंधूंनीं शौर्य प्रगट करून जगपाळरावाची बाजू संभाळिली. ह्यामुळे त्या उभयतांचा स्नेह वृध्दिंगत झाला.पुढें भोसल्यांचा भाग्योदय झालेला पाहून जगपाळरावानें आपली बहीण मालेजीस दिली. हीच शहाजीची आई दीपाबाई होय. पुढें जगपाळरावाच्या मदतीनें जिजाबाईचे लग्न शहाजीशीं झाले. शहाजीनें निमाजशाहीच्या तर्फेने शहाजहानशीं युद्ध केलें, त्यांत जगपाळरावानें शहाजीस मदत केली. ह्या लढाईंतच जगपाळराव स.१६२९ त अहंमदनगरजवळ मरण पावला.
पश्चात त्याचा प्रौढ मुलगा मुधोजीराव (दुसरा) फलटणचा अधिकारी झाला. त्याला दोन बायका असून वडील बायकोला साबाजीराव व जगदेवराव, आणि धाकटीला बजाजी राव व सईबाई अशीं मुलें होती. ह्या सावत्र मुलांत तंटे लागून ते विकोपास गेले. साबाजी व जगदेव हे दोघे घर सोडून मातुश्रीसह विजापुरास गेले. तेथें दरबारांत खटपट केल्यावर त्यांस दहिगांव व भाळवणी हे दोन गांव स्वतंत्र तोदून मिळले (१६३४). अशा रीतीनें निंबाळकरांच्या तीन स्वतंत्र शाखा झाल्या. ह्या गृहकलहामुळें जहागिरांचे नुकसान झालें. मुधोजीराव आजूबाजूस पुंडावे करूं लागला म्हणून त्यावर आदिलशहाची फौज चालून आली; त्याचा पराभव होऊन, आदिलशहानें त्यास बंडखोर ठरवून सातारच्या किल्ल्यावर कैदेत ठेविलें (स.१६३१). येथें तो सात वर्षें होता. त्या मुदतीत फलटणची जहागीर जप्त होती. मुधोजीनें आपली धाकटी बायको व तिची मुलें बजाजी व सईबाई यांस, आपल्याजवळ बोलावून घेतलें. पुढें शहाजी विजापूरच्या नोकरींत राहिल्यावर त्यानें आपलें वजन खर्च करून मुधोजीची (१६३८) सुटका करविली. ह्या उपकारामुळें मुधाजीनें आपली मुलगी शिवाजीस दिली. (१६३९).
शिवाजीनें पुढें जो स्वतंत्र होण्याचा उपक्रम चालविला त्यास मुधोजीचें साहाय्य होते ही गोष्ट  विजापूरदरबारास खपत नव्हती. शिवाय मुधोजीच्या मनात असे होतें कीं, आपल्या पश्चात फलटणचा कारभार बजाजीस मिळावा. ह्या गोष्टीस त्याचे वडील मुलगे कबूल नव्हते. ते विजापुरची मदत घेऊन मुधोजीवर चालून आले. शिरवळनजीक भोळी येथें लढाई होऊन मुधोजी एका वडाच्या झाडाखाली पुत्राच्या हातून मारला गेला, त्यास बापमारीचा वड असें म्हणतात (इ.स.१६४४). ह्या लढाईंत बजाजीस कैद करून विजापुरास नेलें. तेथे बापाच्या अपराधाबद्दल त्यास जिवें मारण्याची आज्ञा झाली. परंतु आदिलशाहाच्या मुलीनें त्याला बाटवून त्याच्याशीं लग्न केल्याने त्याची शिक्षा रद्द झाली. बजाजी काहीं काळ विजापुरी राहिल्यावर देशमुखीनें फर्मान घेऊन फलटणास आला (१६५१). फलटणास अद्यापि बजाजीची समाधि (घुमट) आहे. त्यास पुढें जिजाबाईनें शुंभुमहादेवाच्या देवळांत प्रायश्चित्त देऊन परत जातींत घेतले आणि त्याचा मुलगा महादजी ह्यास शिवाजीची मुलगी सखूबाई दिली.
इ.स.१६६१ च्या पावसाळयानंतर आदिलशहा कर्नाटकांतील बंडें मोडण्याकरितां त्या प्रांतीं गेला तेव्हा बजाजी त्याच्याबरोबर होता. इ.स. १६६५ (नोव्हेंबर) त मोंगल व शिवाजी यांचें संयुक्त सैन्य विजापुरच्या मोहिमेवर निघालें. तेव्हां त्यांनीं प्रथम बजाजीपासून फलटण, व ताथवडयाचा किल्ला घेतला. हीं ठाणीं पुढें १० वर्षांनीं बजाजींनें मोंगलांपासून परत घेतलीं. बजाजीची मदत शिवाजीस गुप्तपणे असे. बजाजीच्या मुसुलमान बायकोस मूल झाल्याचें दिसत नाहीं. हिंदु स्त्री सावित्रीबाई हिला महादजी, मुधोजी व वणगोजी (तिसरा) अशीं मुलें होतीं. महादजी हा शिवाजीचा जांवई असून त्याचा एक सरदार होता. तो बहुश: कर्नाटकाकडे असे. संभाजीला त्याची चांगली मदत झाली. संभाजीचा वध झाल्यावर औरंगझेबानें या नवराबायकोस पकडून ग्वाल्हेरीच्या किल्ल्यावर हयातीपर्यंत कैदेत ठेविलें. शिवाजीनें मोजे वाल्हें (जिल्हा पुणें) येथील पाटिलकी जांवयास आंदण दिली होती. महादजीचा पुत्र बजाजी (दुसरा) हा स. १७७४ पर्यंत हयात होता. महादजीचा धाकटा भाऊ मुधोजी. त्याचा मुलगा बजाजी (तिसरा) यास राजाराम छत्रपतीची मुलगी सावित्रीबाई दिली होती पहिला बजाजी स१६७६ च्या सुमारास वारला त्यावर त्याचा तिसरा पुत्र वणगोजी (१६७६-९३) गादीवर आला; याची विशेष माहिती आढळत नाहीं. त्याच्यानंतर जानोजीस (१६९३-१७४८) गादी मिळाली. हा पेशव्यांस मिळून मिसळून वागे. त्याचा मुलगा मुधोजी (तिसरा-१७४८-६५) यानें (तिस-या) मालोजांस दत्तक घेतलें. मुधोजीच्या पश्चात दत्तकाबद्दल भांडण होऊन, सखारामबापू यांच्या सल्ल्यानें पेशव्यानीं फलटणास जप्ती पाठविली. त्या वेळीं मुधोजीच्या सगुणाबाई नांवाच्या स्त्रीनें जप्तीवाल्यांशी लढाई केली तेव्हा पेशव्यानीं जहागीर जप्त करून ती मुधोजी बिन बजाजी एका भाऊबंदाकडे चालविली. बाई त्राग्यानें ६ वर्षें बालेघाटी जाऊन राहिली. पुढें जेजुरीस पुन्हां दत्तकाची चौकशी होऊन व पेशव्यानां लाख रुपये नजर देऊन मालोजीनें जहागिरीचा ताबा मिळविला (१७७४). मालोजी हा पेशव्यांबरोबर चाकरीस असे व जहागिरीचा कारभार सगुणाबाई करीत असें. या घराण्यांत ही बाई फार प्रख्यात झाली. मालोजी हा कर्नाटकांत हरिपंततात्याच्याबरोबर असतां वाख्यानें मेला (१७७७). त्यानें जानराव यास दत्तक घेतलें होतें. जानराव हा बापाप्रमाणेंच पेशव्यांच्या सैन्यांत असे व सगुणाबाईच जहागिरीचा कारभार पाही. ती स.१७९१ त वारल्यावर, जानराव स्वत: कारभार पाहूं लागला. तो स. १८२५त वारला. त्यावर त्याची बायको साहेबजीबाई हिनें स.१८५३ पर्यंत कारभार केला. तिनें मुधोजीराव बापूसाहेब यांनां १८४० त दत्तक घेतलें. त्यानां स. १८६० त संस्थानचा अधिकार मिळाला. त्यानीं पुष्कळ वर्षें राज्य केलें. त्यानीं संस्थानांत ब-याच सुधारणा केल्या. फलटणास पाणीपुरवठयाची योजना केली, मोफत शिक्षण सुरू केलें. हल्ली (१९२५ नोव्हेंबर) त्यांचे दत्तक चिरंजीव श्री मालोजीराव नानासाहेब हे गादीवर आहेत. (इसं; फलटणची हकीकत; वाड-कैफियती; डफ; म. रि. म. वि. २)

संदर्भ : http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-44-29/10086-2013-03-01-12-24-06

1 टिप्पणी: