रविवार, २४ जानेवारी, २०१६

---|| उस्मानाबाद राजे निंबाळकर ||---

छत्रपती शिवरायांविषयी संपूर्ण जगभर 
आदराची भावना असून त्याला मराठवाडा अपवाद असण्याचे कारण नाही. मात्र छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा अंमल आपल्या परिसरावर होता का? याविषयी सर्वांच्याच मनात साशंकता असते. मात्र मराठवाड्यासारख्या दूरच्या भागात छत्रपती शाहूंनी उस्मानाबादच्या राजे निंबाळकर घराण्याला दिलेल्या सनदेची अस्सल प्रत सापडल्याने तुळजापूर परिसरावरही स्वराज्याचा अंमल होता हे यावरून सिद्ध झाल्याने त्या परिसरातील लोकांमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे.  मराठवाड्यासारख्या दुर्लक्षित भागामध्ये अनेक अस्सल कागदपत्रे दडलेली आहेत. अनेक कागदपत्रे आता जिर्ण अवस्थेत असल्याने ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ती बाहेर काढून त्यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे, अन्यथा कालौघात ती नामशेष होऊन या परिसराचा इतिहास काळाच्या पडद्याआड जाईल.  मराठवाड्याचा इतिहास पाहात असताना या ठिकाणी नेहमीच मराठ्यांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे  सर्वसामान्यांची एक भूमिका आहे की, आपण कायमच मुस्लिम सत्तेच्या आधिपत्याखाली राहिलो आहोत. परंतु संशोधनातून आता ही मानसिकता बदलणे सोपे जाणार  आहे. फक्त उस्मानाबादसारख्या गावातून जर अनेक अशाप्रकारची कागदपत्रे उपलब्ध होत असतील तर इतरही अनेक घराण्यांकडे याची पुनरावृत्ती होऊ शकते. उपलब्ध झालेल्या कागदपत्रांत छत्रपती शाहू महाराज, महादजी शिंदेंचे पुत्र दौलतराव यांची अस्सल दानपत्रे उपलब्ध  आहेत. ही सर्व कागदपत्रे ही उस्मानाबादच्या राजे निंबाळकर घराण्याकडे सापडली असून या घराण्यातील कृष्णराव निंबाळकर धाराशिवकर हे निजामाबरोबर मराठ्यांनी केलेल्या युद्धात उस्मानाबाद या ठिकाणी ठार झाल्याचे रियासतीत नमूद करण्यात आलेले आहे. यापलीकडे या घराण्याचा इतिहास उपलब्ध होत नाही. परंतु सापडलेल्या अस्सल कागदपत्रांत अनेक कागदपत्रे अशी आहेत की, ती मराठ्यांचा इतिहास बदलू शकतील. कारण या घराण्याचे संबंध थेट छत्रपती शाहूंबरोबर होते. याशिवाय शाहूंनी आपले मानसपुत्र मानलेल्या अक्कलकोटच्या भोसले घराण्याबरोबर उस्मानाबादच्या निंबाळकरांचे विवाहसंबंध जोडलेले आहेत. याचबरोबर काही मजहरही सापडले आहेत ज्यामुळे उस्मानाबादच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकण्यास मदत होणार आहे.  राजे निंबाळकर घराण्याचा पूर्वेतिहास  उस्मानाबाद (धाराशिव) शहराला प्राचिन इतिहास असून या ठिकाणी असलेल्या धाराशिव आणि चांमर लेण्यावरून हे स्पष्ट होते. याचबरोबर प्राचिन कालखंडात व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले तगर किंवा तेर हे गाव उस्मानाबादपासून फक्त २० ते २२ कि.मी.वर असल्याने उस्मानाबादवर सातवाहन, राष्ट्रकूट यासारख्या पराक्रमी घराण्याची सत्ता असल्याचे दिसून येते. कारण राष्ट्रकुटांच्या काळातच येथील लेण्यांचे काम झालेले आहे. आज या लेण्या धाराशिव लेण्या या नावाने प्रसिद्ध असून त्या अतिशय चांगल्या अवस्थेत असून प्राचिन इतिहासाच्या त्या साक्षीदार आहेत.  मध्ययुगीन कालखंडात हा परिसर अहमदनगरचा 
निजाम, विजापूरचा आदिलशहा तसेच काही कालखंडापर्यंत मोगलांच्या ताब्यात होता. पुढे इ.स. १७२४ नंतर उस्मानाबादचा परिसर हा हैदराबादच्या निजाम राजवटीखाली गेला. पुढे स्वातंत्र्यापर्यंत हैदराबादच्या निजामाने आपले वर्चस्व ठेवले. या राजकीय समीकरणात उस्मानाबादच्या निंबाळकरांचा इतिहास शोधल्यास हे घराणे नगरच्या निजामशाहीपासून शिपाईगिरीवर असावे. कारण निंबाळकर घराण्यात पूर्वीपासूनच राजे ही उपाधी लावल्याचे त्यांच्याकडे सापडलेल्या वंशावळीवरून दिसून येते. 
निंबाळकर घराण्याचा मूळ पुरुष हा यमाजी असल्याचे वंशावळीवरून तसेच त्यांच्या घराण्यातून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट होत असले तरी यमाजीच्याही अगोदर  रघुनाथराव नावाचा निंबाळकर घराण्यातील एक पुरुष जहांगिरच्या फौजेत असल्याचे एका पोथीत सापडलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. मात्र रघुनाथरावांविषयी पोथीशिवाय अन्यत्र माहिती उपलब्ध नाही. त्याच वेळी यमाजीचे एक अस्सल चित्र उपलब्ध असून त्यात यमाजीचा राजेशाही पोषाख, घोडा आणि त्यांच्यावर धरलेले अब्दागिरी तसेच मोरचेल यावरून त्यांच्या ताकदीचा अंदाज येतो. वंशावळीत मात्र यमाजी हेच आद्य पुरुष असल्याचे स्पष्ट होत आहे, कारण वंशावळीत मूळ पुरुषात त्यांचे नाव आद्य पुरुषात दाखविण्यात आलेले आहे.  राधाबार्इंना दिलेली शाहूंची सनद  राजे निंबाळकर घराण्यात यमाजींना त्यांचा आद्य पुरुष मानून जवळपास सर्वच घरांमध्ये त्यांचा फोटो असला तरी अद्यापपर्यंत त्यांच्याविषयी कुठलेही कागदपत्र  उपलब्ध झालेले नाही. तरी परंतु त्यांच्या फोटोचे बारकाईने निरीक्षण केले असता ते कोणी तरी मोठे पुरुष असावेत हे स्पष्ट होते. त्या कालखंडातील घोड्यावरील सवारी, सोबत सेवक आणि त्यांच्यावर धरण्यात आलेले मोरचेल यावरून हे सिद्ध होते. काळानुरूप कागदपत्रांचा अपव्यय आणि नवीन पिढीत होणारे बदल यामुळे बरीच अस्सल साधने नष्ट पावलेली असतात. तरीपण काही मौखिक माहितीच्या आधारे इतिहासावर प्रकाश टाकण्यास मदत होत असते. त्यानुसार उस्मानाबादच्या निंबाळकर घराण्यात नेहमीच एक चर्चा कायम ऐकायला मिळत असते की, छत्रपती शिवरायांच्या घरातील एक मुलगी आपल्या घराण्यात देण्यात आलेली आहे. यापलीकडे अन्य कुठलाही पुरावा उपलब्ध होत नव्हता. सुदैवाने मला या घराण्यातील राधाबार्इंना छत्रपती शाहूंनी दिलेली वैयक्तिक स्वरूपातील अस्सल स्वरूपातील सनद येथील श्रीमती पुष्पाबाई विजयसिंह राजे निंबाळकरांकडे सापडल्याने उस्मानाबादच्या पर्यायाने मराठ्यांच्या इतिहासाला नवीन संदर्भ प्राप्त झाला आहे. 
त्यानुसार इ.स. १७२० साली छत्रपती शाहू महाराजांनी उस्मानाबादच्या राजे निंबाळकर घराण्यातील राधाबार्इंना चोळी-बांगडीकरिता उस्मानाबादची जहागिरी दिल्याचे यात स्पष्ट करण्यात आलेले आहे. या सनदेवर शाहू आणि त्यांचा पेशवा बाळाजी विश्वनाथचा  शिक्का आहे. अस्सल स्वरूपातील या सनदेचा विचार केल्यास निंबाळकर घराण्यातील या चर्चेला पुष्टी मिळते. कारण राधाबाई कोण? याविषयी इतर कुठल्याही कागदपत्रात याचा संदर्भ लागत नाही. त्याचबरोबर तत्कालीन धराशिव परिसराची जहांगिरी दिल्याने या परिसरावर मराठ्यांची सत्ता होती का? याविषयी माहिती घ्यावी लागणार आहे. आणि जर सत्ता नसेल तर किमान मराठ्यांकडून या परिसरातून चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांकडे असावेत हे स्पष्ट होत आहे.  उस्मानाबादच्या निंबाळकरांचे इतिहासातील स्थान  राधाबार्इंच्या सनदेशिवाय अन्य विशेष माहिती उपलब्ध होत नसली तरी या सनदेवरून उस्मानाबादचे निंबाळकर हे मराठ्यांकडून लढत असल्याचे स्पष्ट होते. पुढे पानिपत युद्धानंतर मराठ्यांची ताकद क्षीण झाली. तर याच वेळी हैदराबादच्या निजामाने मराठ्यांच्या प्रांतावर आक्रमण करतानाच त्यांचे एक-एक सरदारही फोडण्यास सुरुवात केली. या वेळी निजामाचा सरदार 
लाला ब्रिजनाथ याने मराठ्यांच्या प्रांतावर आक्रमण करून नळदुर्ग, गुंजोटी, अक्कलकोट हे भाग घेऊन उस्मानाबादवर आक्रमण केले. तेव्हा मराठ्यांकडील वैरागचे मकरंद आणि धाराशिवचे कृष्णराव असे दोन्ही निंबाळकर निजामाला जाऊन मिळाले. लाला ब्रिजनाथ हा एक-एक प्रांत घेत पुढे जात असताना धाराशिव या ठिकाणी मराठे आणि निजाम यांच्यात युद्ध झाले. या वेळी मराठ्यांविरुद्ध लढताना कृष्णराव निंबाळकर धाराशिवकर हे भाल्याची जखम लागून ठार झाले. या वेळी त्यांच्या पत्नी आनंदीबाई सती गेल्या. कपिलधार परिसरात जी मोठी समाधी आहे, ती याच आनंदीबार्इंची आहे. पेशवे कालखंडात उस्मानाबादच्या निंबाळकर घराण्याने बराच नावलौकिक मिळवलेला आहे. कारण कृष्णरावांचा मुलगा आनंदराव हा पुढे निजामाशी लढताना एका तहाप्रसंगी मुरादखान, हणमंतराव निंबाळकर यांच्यासोबत तहात भाग घेताना दिसून येतो.  याचबरोबर कृष्णरावांची एक मुलगी म्हैसळाबाई यांचा विवाह अक्कलकोट संस्थानाचे राजे मालोजी ऊर्फ बाबासाहेब (१८०३-१८२८) यांच्यासोबत झालेला होता. पुढे बाबासाहेबांचे पुत्र आप्पासाहेब (१८२२-१८५७) यांना कृष्णराव निंबाळकरांचा नातू नरसिंगाची  मुलगी अहिल्याबाई दिलेली होती. त्यामुळे कृष्णरावांविषयी बरीच माहिती उपलब्ध होत असतानाच तांदुळजा येथील बावणे घराण्याकडे सापडलेल्या कागदपत्रांत कृष्णरावांचा एक फोटोही सापडला असून फोटोंच्या निरीक्षणावरून त्यांचे स्थान निश्चित करता येऊ शकते. कारण याच फोटोत त्यांच्याकडील घोड्याच्या किमतीही दिलेल्या आहेत. त्यामुळे कृष्णराव निंबाळकर हे या घराण्यातील सर्वांत पराक्रमी आणि आपल्या कर्तृत्वाने नावारूपाला आलेले पुरुष असावेत हे स्पष्ट आहे. त्यातच तत्कालीन कालखंडातील अक्कलकोटचे भोसले हे सातारच्या छत्रपतींचे मानसपुत्र आणि या घराण्यात उस्मानाबादच्या निंबाळकरांचे नातेसंबंध असल्याने त्यांचा सामाजिक दर्जाही सांगता येतो.  निंबाळकर घराण्याची माहिती देणारा एक  मजहरही उपलब्ध झालेला असून त्यात उस्मानाबादच्या जहागिरीविषयी माहिती दिलेली आहे. या पत्रात संपूर्ण उस्मानाबादचा मोकासा आनंदीबार्इंच्या नावाने देण्यात आलेला असून यात संताजी आणि रघुनाथराव राजे निंबाळकरांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर या मजहरावर बारा बलुतेदारांच्या निशाणीसह सह्या आहेत. त्याचबरोबर पेशव्यांच्या आणखी एका पत्रावरून आनंदीबाई निंबाळकर (दुस-या) यांच्याकडे तुळजापूर परिसराचा मोकासा असल्याचे स्पष्ट होते.  त्यानंतर याच निंबाळकर घराण्याकडे महादजी शिंदेंचे पुत्र दौलतराव याने दिलेले पत्र उपलब्ध झाले असून त्यात फकिरजी निंबाळकरांनी आपली जहागिरीची व्यवस्था करण्यासाठी काळेंची नियुक्ती करण्यात आलेली होती. पुढे हा काळे ठरलेली रक्कम देण्यास टाळाटाळ करताना दिसून येतो. त्यातूनच उस्मानाबादच्या जहागिरीत फकिरजी निंबाळकर आणि काळे यांच्या दरम्यान तंटा उपस्थित झालेला असून त्यात दौलतरावाने निंबाळकरांची बाजू घेतलेली आहे. खरे तर या वादात दौलतरावाने बाजू घेताना या परिसरावर शिंदे घराण्याचा संबंध कशारीतीने आला हे स्पष्ट होत नसले तरी प्रथमच उस्मानाबादशी शिंदे घराण्याचा संबंध दर्शविणारा कागद सापडलेला आहे. हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. तर सुरुवातीपासूनच निंबाळकर घराण्यात मालमत्तेवरूनचे वाद मोठ्या प्रमाणावर चालत असल्याने यातून या घराण्याचे अनेक कागद सापडतात. अशारीतीने उस्मानाबादसारख्या दुर्लक्षित भागात छत्रपती शाहू, पेशवे आणि दौलतराव शिंदे यांच्या अस्सल स्वरूपातील सनदा सापडल्याने इतिहासातील उस्मानाबादचे स्थान निश्चित करता येते. मा. मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, ओमराजे निंबाळकर, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर हे याच घराण्यातील असून मा. विलासराव देशमुख यांच्या आत्या श्रीमती पुष्पातार्इंचा विवाह निंबाळकर घराण्यात झालेला आहे. अशारीतीने या परिसरावर दोनशे वर्षे निजामाची सत्ता असली तरी उस्मानाबादमध्ये छत्रपती शिवरायांच्या नातवाने दिलेला कागद सापडल्याने मराठवाड्याच्या इतिहासात छत्रपतींचा संबंध स्पष्ट होतो. 
डॉ. सतीश कदम 
मोबा. ९४२२६ ५००४४

1 टिप्पणी: